काळजी फक्त प्रेमात घेता येते असं नाही…
एका छोट्याश्या भेटीनंतर नंतर आता सगळे घरी जात होते. काहींना रिक्षा मध्ये बसवून दिलं होतं आणि काही जण ट्रेनने जाणार असल्यामुळे आम्हाला पुन्हा स्टेशन कडे येणं भाग होतं आणि मित्र आणि कुटुंब म्हटलं की काळजी घेणं स्वाभाविक आहे. प्लॅटफॉर्म वर बसलेलं असताना नको ती माणसं दिसतात म्हणा, पण त्या गर्दीत काही जण अशे असतात जे त्या नको असलेल्या माणसांना सुद्धा विसरायला लावतात. एक झलक आणि मन गुल होऊन जातं. असं काहीसं काही क्षण चालूच राहतं. जोवर कोणी दुसरं नजरेचा घाव करत नाही तोवर.
जर का, सोबत असलेल्या बॉडीगार्ड मैत्रिणींना कळलं तर मात्र बऱ्याच ठिकाणी घाव होतील हे वेगळं सांगायला नको. साहजिकच आहे ते आपल्याला परवडणार नाही निदान त्या क्षणाला तरी. पण त्याची मजा काही औरच आणि ते क्षण तसेही खूप गरजेचे असतात. आपल्या आयुष्यातील पुस्तकात रम्य अश्या कविता बनून राहायला. शेवटी ट्रेन आली आणि तिला “टाटा बाय बाय” केलं. दोन तीन जनी अजून “बाय बाय” करून गेल्या ती गोष्ट तिच्या लक्षात आली असावी. पण ती उतरून येणार तर नव्हती ना त्या वेळी त्यामुळे तेवढ्यापुरतं तरी वाचलो.
आता दोघेच होतो आम्ही. स्टेशन बाहेर येताच गाडी काढून गेलो सहज गप्पा मारायला. नेहमीच्या ठिकाणी बसलो होतो. गाडी समोरच उभी केली होती. गप्पांची मेहफिल नुकतीच सुरु झाली होती. ती इतक्यात कशी संपेल. घड्याळात बघितलं तर १० वाजून ३० मिनटं झालेली. बघता बघता कधी १२ वाजायला आले कळलंच नाही. रोजची रूटीन आणि ऑफिसचा कंटाळा आलाय हे त्याच्याकडून किमान ४ वेळा ऐकलं असावं. अगदी सलग नाही काही, आलटून पालटून पण ते होतंच. आणि ते ऐकलं ना कि आम्ही दोघंही हसत सुटायचो आणि कितीतरी वेळ हसू आवरतच नव्हतं. असं अनपेक्षित भेटणं आणि त्या माहोलात असलेलं शब्दांचं आणि भावनेचं वर्णन शब्दात करणं फार कठीण असतं.
बोलत असताना जवळ जवळ १२ च्या सुमारास कॉल आला. ट्रेन मध्ये ज्या मैत्रिणीला बसवून दिलेलं ना तिचाच होता तो. खरतर तिची तब्येत जरा ठीक नव्हती आणि तरीही ती भेटायला आली होती. जाताना “I’m Okay”, असं म्हणून ती ट्रेन मध्ये चढली होती. पण आता कॉल आलेल्या तिच्या अवाजावरून असं वाटत होतं कि तिची तब्येत अजून खराब झाली आहे. डॉक्टरकडे जा असं सांगणं पण चुकीच होतं कारण १२ वाजून गेलेले. इतकंच विचारलं घरात औषध आहे का किंवा एखादी गोळी वगैरे.
“नाही आहे” आणि त्यात तिची बहीण पण सोबत नव्हती. घरी दुसरं कोणीच नव्हतं. बर मग मेडिकल उघडं असेल का? याची सुद्धा तिला कल्पना नव्हती. कारण ती खूप थकली होती मनाने आणि त्या आजारपणाने. काही गोष्टींचं टेन्शन आलं की आजारपण येतच आपोआप न बोलवता. मित्राने विचारलं, “काय झालं ?” म्हटलं “बर वाटत नाहीये आणि घरात औषध पण नाही.” आपण जाऊया का इथून औषध घेऊन, बघू मेडिकल असेल चालू एखाद दुसरं काय बोलतोस ?”
“आता, भाई वाजलेत किती बघ! त्याचं तसं उच्चारणं स्वाभाविक होतं. कारण पुन्हा तिला काही प्रॉब्लेम नको इतक्या रात्री भेटायचं म्हटलं तर. त्याला म्हटलं “जाऊ ना! नंतर स्वतःच म्हणाला “चल जाऊच आता, तिच्यासाठी हे पण करू.” मी म्हटलं “नक्की ना !” “बस पटकन अजून लेट नको करुस नाहीतर उरले सुरलेले मेडिकल पण बंद होतील”.
आम्ही निघालो खरं पण तिला याची काहीच कल्पना नव्हती की आम्ही तिला भेटायला येतोय ते. तसं तिचं घर लांब होतं थोडं. म्हणजे आम्ही जिथे होतो तिथून चौथं स्टेशन, पण अंतर जास्त होतं. आता ट्रेन फक्त जायला मिळणार होती येताना नाही आणि तसही गाडी होती मग ट्रेनने कशाला. त्यामुळे निघालो लवकर उशीर नको म्हणून. कॉल ठेवायच्या आधी तिने सांगितलं होत की, “तुम्ही आता जाऊन आराम करा जास्त वेळ बाहेर भटकू नका.” आमचं अपेक्षित असं उत्तर तिला मिळालेलं “हो! हो जातोच आहे आता.”
आम्ही निम्मा रस्ता पार केला होता. रात्रीच्या सवारीच वर्णन वेगळं करायला नकोच पण यावेळी रस्ता सामसूम होता आणि मोजक्याच गाड्या होत्या रस्त्याला. साहजिक आहे मध्य रात्र उलटून गेलेली म्हटल्यावर असं असणारच. अर्ध्या रस्त्यात पोहचल्यावर एका कोपऱ्याला एक मेडिकल दिसलं. त्याला आवाज दिला आणि सांगितलं “थांब, थांब” कारण तो शटर बंदच करत होता म्हंटल पुढे मेडिकल चालू असेल नसेल इथूनच घेऊ. त्यानुसार त्याच्याकडून औषध घेतलं पेन-किलरची गोळी सुद्धा घेतली आणि पुन्हा तिच्या घराकडे निघालो.
अर्धा तासानंतर तिच्या कॉम्प्लेक्स जवळ पोहचलो आणि बिल्डिंगच्या बाहेर गेट जवळ उभं राहिलो. तिला कॉल लावला आणि याला दिलं बोलायला कारण मला माहीत होतं ती हमखास ओरडणार होती. “साल्या, शिव्या खायच्या वेळेलाच मला दे बोलायला तू.” खूप हसायला येत होत त्यावेळी पण म्हटलं “भाई, तूच आहेस यार आता काय करू शकतो आपण.” “गप तू” असं बोलून त्याने तिला कॉल केला आणि विचारलं “जेवलीस का?” आणि नंतर “औषध घेतलं का?” असं मुद्दाम विचारलं.
“हो जेवली आणि औषध नाही आहे सांगितलं ना मगाशी इतक्यात विसरला तू?” “तू त्याला बोललीस मला नाही, एक काम कर चल ये खाली औषध घायला आणि पाणी पण आन सोबत आम्ही आलोय तुझ्या बिल्डिंग खाली.” तिने कॉल कट केला आहे मला कळताच, त्याला म्हटलं आता खूप ओरडा पडणार आहे असं म्हणून दोघेपण हसायला लागलो. काही वेळाने ती खाली आली, “यायला हवंच होतं का! सांगितलं होत ना I’m Okay तरी”. असं बोलून तिने हातावर जोरात मारलं. तिला काही न बोलता हसत हसत हात पुढे केला आणि म्हटलं ह्या गोळ्या घे लगेचच आता आमच्या समोर.
तेवढयात तो बोला की,”आम्हाला बिलकुल भरवसा नाही तुझ्यावर तू घरी गेल्यावर घेशीलच त्या गोळ्या याचा.” सांगितल्याप्रमाणे तिने तसं केलं आणि बोलली “काय करू रे तुमचं, पण Thank You So Much इथे आल्याबद्दल.” “बस बस आता जास्त फॉर्मालिटी नको करुस” असं बोलून तो गाडी स्टार्ट करत होता. तिला विचारलं “आता ठीक ना ?” “थोडं रागवल्यासारखं पण प्रेमाने म्हटली “हो” तिला म्हटलं “Take Care” ती म्हणाली “काळजी घे तू ही, नीट जा.” आम्ही पण मग पुन्हा आलो त्या वाटेने धीम्या गतीने रमत गमत आपल्या घरी.