प्रेम ज्याचं मला कौतुक वाटतं, हेच ते…
ज्या दिवशी मला असं वाटलं मी मला हरवलं, त्याच दिवशी मला माझं प्रेम मिळालं. प्रेम ज्याचं मला कौतुक वाटतं. जसं मला हवं होतं तसंच अगदी. तुमची काळजी घेणारं आणि तुमच्या सोबत कोणीतरी असणारं कोणाला नको असतं. जेव्हा मी प्रेमा-सारख्या गोष्टीवरून मन काढून घेतलं. तेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. जेव्हा मला कोणाची तरी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्याने माझ्याजवळ राहून मला साथ दिली.
प्रत्येकाला एका वेळेनंतर वाटतंच, माझ्याजवळ सुद्धा कोणीतरी असावं. माझ्याकडे लक्ष देणारं, काही हवं नको ते बघणारं, काळजी घेणारं आणि मनापासून प्रेम करणारं. कारण दर वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपले आई-वडील नाही येऊ शकत. खरं सांगायचं तर हे फार मस्त असतं आणि हो! मी हे सगळं अनुभवलं आहे त्याच्यासोबत प्रत्येक क्षणाला.
हे सगळं सुरु झालं जेव्हा आम्ही माझ्या मैत्रिणीच्या गावी गेलेलो जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत. अर्थात हा पण तिथे होता. एकदा रात्री जेवण वगैरे आटपून अंगणात बसून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसलो होतो. त्यात चंद्र लालबुंद झाला होता. मी त्याला आवाज दिला,”हे बघ ना किती सुंदर दिसतोय तो चंद्र आणि त्याच्या छटा पडल्यात त्या!” तो म्हणाला,”हो यार, खूपच मस्त आहे क्लास एकदम.” मग तिथेच बसून आम्ही त्या सुंदर वातावरणात एकत्र वेळ घालवला. फिरण्याच्या पूर्ण वेळेत आम्ही दोघे एकत्रच होतो. आमचे सगळे मित्र आम्हाला चिडवत होते आणि त्या वेळेची मजा घेत होते. पण आम्ही लक्ष नाही दिलं.
तो एक क्षण आला ज्या वेळेला मला वाटलं मी प्रेमात आहे. कारण एक वेळ आवड बदलू शकते पण प्रेम बदलता येत नाही मला तरी असं वाटतं. तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि कदाचित राहील सुद्धा कायमच. आपल्या जवळच्या माणसाच्या प्रेमात पडणं एक मजेदार प्रसंग असतो. कारण इथे प्रेम व्यक्त करावं लागत नाही ते आपणहून समजलं जात जर का ते हवं असेल. प्रत्येक क्षण त्या सोबतीचा खूप सुंदर आणि खास होता माझ्यासाठी. तर हे आहे माझं प्रेम.