वेळ पुरला नाही

वेळेत वेळ वाया घालवणाऱ्यांसाठी

प्रास्ताविक– या काल्पनिक कथेत आयुष्य जगताना कायम धावपळ व भीतीमुळे वाया गेलेला वेळ एका शाळकरी जीवनाच्या अनुभवावरून व्यक्त केला आहे…

वेळ पुरला नाही
वेळ पुरला नाही

आज पहाटे समजलं की काही क्षणांचं हे आयुष्य क्षणात संपणार होतं. क्षणात जाग आली न जाणलं की ते पहाटेच स्वप्न होतं. पहाटेची स्वप्न खरी होतात या विचारातच आयुष्याचे काही सेकंद वाया घालवले. चेहऱ्यावर पाणी मारले आणि फ्रेश होऊन मस्त उकाडा घेतला. नेमकी सकाळची मौज आटपून न होता पहाटेचं स्वप्न खरं झालंच…

माझ्या दोस्ताचा फोन आलेला. थोडं टाळायचं होतं त्याला पण म्हटलं उचलूया. मी काही बोलण्या आधीच तो बोलून गेला आणि आमच्या निरागस मनावर टाकीचे घाव घातले गेले… “आज १२ वाजता परीक्षा आहे!”

हे चार शब्द अगदी अणुबॉम्ब सारखे कानावर आदळले. विषय माहीत नव्हता म्हणजे सरप्राईज टेस्ट’. उरलेल्या वेळेत पुस्तकं चाळायला घेतली पण कुठलं नेमकं चाळायचं हे माहीत नसल्याने काहीवेळ चाळणीच बाजूला सारली. परीक्षेचं सगळं साहित्य घेतलं आणि कधी देवाच्या फोटोला हात पण न लावणारा मी आज चक्क माथा टेकून बाहेर पडलो. एक्साम हॉल कडे पाय सरसावत होते तसतशी धास्ती वाढत होती आणि नेहमी कानावर पडणारा प्रश्न एका पठ्ठ्याने विचारलाच…

“तुझा झाला का सगळा अभ्यास? माझं थोडंसच राहिलंय वाचायचं!” हे वाक्य हृदयाचा ठोका चुकवून गेलं. काही सेकंदाचा पॉज सुद्धा गेला पण या कोवळ्या धक्क्यातून बाहेर पडून मी हॉल मध्ये शिरलो. माझ्या मागोमाग सरांची एन्ट्री झाली.. सरांनी एक दरार्याची नजर फिरवली अन सगळा वर्ग गप्प झाला. सरांनी काहीच न बोलता फळ्यावर एक प्रश्न लिहिला. ‘ जगलेलं आयुष्य या विषयावर ५०० ते ६०० शब्दात तुमचं मत मांडा, गुण २०.

वेळ पुरला नाही
वेळ पुरला नाही

वर्ग तसा खुश होता आणि मी सुद्धा कारण प्रश्न दिसायला फारच सोप्पा होता. सरांनी उत्तरपत्रिका वाटल्या नि म्हणाले “वेळ पाऊण तास” पहिली पाच मिनिटं उत्तरपत्रिकेवरील रिकाम्या जागा भरण्यात गेली. मग जगलेल्या आयुष्याकडे वळलो आणि विषय किती खोल आहे. याची जाणीव क्षणात झाली. परीक्षेला अभ्यास न करता आलं की वर्षभरात किती उनाडक्या केल्यात हे चटकन आठवतं. आणि इतक्यात सरांच्या मुखातून पुन्हा ठोका चुकवणारं वाक्य आलं.

“प्रत्येकी १८ गुण मिळावा, पूर्ण वर्ग सहामाहीला नापास झालाय” या नापास शब्दाने कित्येकांचे हृदय नक्कीच फेल झालेले, त्यात मीही होतो आणि इतक्यात आशेचा किरण दाखवणारं वाक्य पुन्हा सरांच्या तोंडून आलं…

“काही जण पास सुद्धा झालेत”. त्या पास शब्दात माझी बसण्याची क्षमता थोडी कमीच होती पण एक दिलासा म्हणून मी सत्य स्वीकारलं. १५ मिनिटांचा वेळ सरला नव्हता तितक्यात एक ओळखीचा आणि नकळत मन वेधून घेणारा आवाज कानी आला अन संपूर्ण वर्ग त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागला… “सर सप्लिमेंट!”

माझ्यासारख्या कित्येकांच्या मनात हाच विचार होता की आमचं आयुष्य दुसऱ्या पानावरच अडकलंय आणि याने चक्क पुरवणी घेतली? जास्तीत जास्त शब्दात अंतर ठेवून मी ओळी वाढवल्या आणि कसे बसे माझे तीन पानांचे आयुष्य जगाला पाच पानी करून दाखवलं. वेळ संपली, सरांनी उत्तरपत्रिका मागितल्या पण मी लिहितच होतो. सरांनी पेपर हिसकावून घेतला, त्यात जगलेलं आयुष्य थोडं फाटलं आणि पुन्हा काही शब्द कानावर आले…. “आयुष्य जगायला वेळ पुरला नाही का?”

-शायAr

Related Posts

2 thoughts on “वेळ पुरला नाही

Comments are closed.